पुणे : मागील वर्षी जुन महिन्यात घोषणा करण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या ई-बसला मार्गावर धावण्यासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यातून सोलापुर, कोल्हापुर, औरंगाबाद व नाशिक या मार्गांवर बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण अद्याप चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामही सुरू झालेले नाही. पुण्यातील हे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून ते पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागु शकतो.केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेतील दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासाठी २४० ई-बसला मंजुरी मिळाल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतीच केली. त्यापैकी १०० ई-बस एसटी महामंडळाला मिळणार आहे. मागील वर्षीही या योजनेमध्ये एसटीला ५० बस मिळाल्या आहेत. या बस प्रमुख शहरांना जोडण्यासाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून महिन्यामध्ये ‘शिवाई’ असे ई-बसचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर मुंबई-पुणे मार्गावर या बसची चाचणीही घेण्यात आली. पण त्याला मंजुरी मिळण्यास विलंब लागला. तर हिरवा कंदील मिळाल्यानंतर दीड-दोन महिन्यांतच लॉकडाऊन जाहीर झाल्याने बससेवाच ठप्प झाली.पहिल्या टप्प्यातील ५० बसपैकी २५ बस पुण्याला मिळणार होत्या. तर उर्वरीत सोलापुर, कोल्हापुर, औरंगाबाद व नाशिकला देण्यात येणार होत्या. या बस मार्गावर धावण्यासाठी पाचही ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी करणे आवश्यक आहे. पुण्यात स्वारगेट येथील विभागीय कार्यालयाच्या आवारात स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. लॉकडाऊनपुर्वी त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार जुनमध्ये बस मार्गावर धावल्या असत्या. पण लॉकडाऊनमध्ये काहीच काम झाले नाही. याठिकाणी महावितरणकडून उच्चदाब क्षमतेची भुमिगत वीजवाहिनी टाकून दिली जाणार आहे. या कामांसह चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. पण अद्याप कोणतेच काम सुरू झालेली नाही. त्यामुळे ई-बस धावण्यासाठी नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.-----------------------फेम इंडिया योजनेअंतर्गत फेज दोनमध्ये महाराष्ट्राच्या वाट्यालला २४० ई-बस आल्या आहेत. त्यापैकी १०० बस एसटी महामंडळाला मिळणार आहेत. तर १०० बस नवीन मुंबई महापालिका आणि ४० बस मुंबईतील बेस्टला मंजुर झाल्या आहेत. देशात सर्वाधिक महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. तर ४३० बस गोवा, गुजरात व चंदीगढ या तीन राज्यांमध्ये विभागून देण्यात आल्या आहेत.------------
--