ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन नववर्षाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल कंपन्यांनी देशवासियांना खुशखबर दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. पेट्रोल ६३ पैसे प्रति लिटर आणि डिझेल १.०६ पैशांनी स्वस्त होणार आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
तेल कंपन्या १५ दिवसातून एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीची समीक्षा करतात, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर आणि घरगुती पातळीवरील चलन विनिमय दर विचारात घेण्यात येत असतो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो.
डिसेंबर महिन्यातील हि तिसरी कपात आहे. यापुर्वी १ डिसेंबर आणि 15 डिसेंबर रोजी पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती.
विमान इंधन दरात १० टक्के कपात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर घसरल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्यासोबतच विमान इंधनही प्रति किलोलिटर ४४२८ रुपयांनी (९.९९ टक्के) स्वस्त करण्यात आले आहे. आता विमान इंधन ३९८९२.३२ रुपये प्रति किलोलिटर दराने मिळेल, असे इंडियन आॅईल कार्पोरेशनने म्हटले आहे.