(Image Credit : lokmat.news18.com)
वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एक घटना बुलडाण्यातील जळगाव जामोदमधून समोर आली आहे. इथे प्रसूती कळा आलेल्या नसतानाही एका डॉक्टरने महिलेची प्रसूती केली आणि यात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची पोलिसात तक्रार करूनही काहीही कारवाई न झाल्याने महिलेच्या पतीने अनोखं आंदोलनही केलं. जे पाहून लोकांचे डोळे पाणावले होते. महिलेच्या पतीने उपविभागीय कार्यालयासमोर स्वत:ला एका खांबाला बांधून घेऊन हे आंदोलन केलं. अखेर या आंदोलनाची दखल घेत न्याय मिळवून देण्यात येईल अशा आश्वासनाचे पत्र दिले तेव्हा त्याने हे आंदोलन मागे घेतलं.
न्यूज १८ लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, शारदा संजय भोंगाळे या जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथे राहणाऱ्या महिलेची प्रसूती जळगाव जामोद येथील समाधान हॉस्पिटलमध्ये केली होती. येथील डॉ. अविनाश पाटील यांनी महिलेची प्रसूती अतिशय क्रूरपणे केली. यातच बाळ दगावल्याचा आरोप महिलेचे पती संजय भोंगाळे यांनी केला. त्यांनी डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
साधारण महिनाभरापूर्वी ही घटना घडली होती. पण तरी सुद्धा डॉक्टरवर काहीही कारवाई होत नसल्याचे पाहत संजय भोंगाळे यांनी आंदोलनास सुरूवात केली. त्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर एका खांबाला स्वत:ला बांधून घेऊन आमरण उपोषण केले. या आंदोलनामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आणि संज भोंगाळे यांना कारवाईचे लेखी आश्वासन पत्र दिले. तेव्हा त्यांनी आंदोलन मागे घेतले.
शारदा भोंगाळे यांचा प्रसूतीसंबंधी उपचार जळगाव जामोद येथील डॉ. उज्वला पाटील यांच्याकडे सुरू होते. उज्वला पाटील या तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. उज्वला पाटील यांचे पती डॉ. अविनाश पाटील यांनी शारदा भोंगाळे यांना त्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे महिलेला प्रसूती कळा येत नसतानाही तिची प्रसूती केली. इतकेच नव्हे तर संजय भोंगाळे यांच्या आरोपानुसार, महिलेच्या गर्भपिशवीत हात घालून बाळाला क्रूरपणे ओढून बाहेर काढले. यातच बाळाचा मृत्यू झाला. हा सगळा प्रकार डॉ. अविनाश पाटील यांनी केल्याचं महिलेने तक्रारीत सांगितलं आहे.