मुंबई: देशात वैद्यकीय क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तरीही नवजात बालकांना आरोग्यासाठी ज्या सोयी -सुविधा मिळायला हव्यात त्या सुविधा मिळताना दिसत नाहीत. या सोयी-सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. यामुळे नवजात बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईच्या एका रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. देशात दरवर्षी ८ लाख नवजात बालकांचा मृत्यू होतो. रुग्णालयात बाल अतिदक्षता विभाग सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असल्यास त्या ठिकाणी बालकांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाऊ शकते. प्रत्येक नवजात बालकाची काळजी घेणे आवश्यक असल्याने खेड्यापाड्यात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर राज्यातील आरोग्य सुधारणांवर शासन भर देत आहे. सर्वांना सुलभ, परवडणाऱ्या दरात आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्यासाठी उपक्रम आखले जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत या कार्यक्रमात म्हणाले, शासन जव्हार, मेळघाट, अक्कलकुवा, धडगाव अशा आदिवासी ठिकाणच्या नवजात बालकांच्या आरोग्य सुविधांसाठी उपाययोजना आखत आहे. शासनाने गाव-खेड्यात गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधांसाठी प्रयत्न सुरु आहेत. परिचारिकांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नवजात बालकांना सोयी-सुविधा आवश्यक
By admin | Published: November 15, 2016 6:37 AM