- नरेश डोंगरेनागपूर : ज्युडोमध्ये ब्लॅक बेल्ट आणि बॉक्सिंगमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप पटकावणारे हेमंत नगराळे यांनी राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद प्राप्त करण्यातही यश मिळवले. आता पोलीस दलाला सर्वच दृष्टीकोनातून सक्षम करणार, अशी सूचक प्रतिक्रिया नवनियुक्त पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी लोकमतला दिली.हायस्कूलपासून तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नगराळे यांनी पहिली नोकरी कोराडी थर्मल पॉवर मध्ये अभियंता म्हणून केली. नंतर ते पोलीस दलाकडे वळले. आज नगराळे यांची आज राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती झाली. नगराळे यांचे जन्मगाव चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे होय. तेथे त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय शिक्षण घेतले. नंतर नगराळे यांचे कुटुंबीय नागपुरात आले. त्यांचे वडील त्यावेळी बेरार प्रांतात एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर म्हणून सेवारत होते. त्यांना दिलीप नगराळे नामक मोठे बंधू तर कीर्ती रमेश भालेकर या मोठ्या भगिनी आहेत. ही संपूर्ण मंडळी नागपुरातच राहतात.एक उत्कृष्ट ज्यूडो पटू म्हणून त्यांचा कॉलेज लाईफ मध्ये नागपुरात चांगला दरारा होता. बनावट मुद्रांक घोटाळ्याच्या तपासामुळे राज्य पोलिस दलात प्रकाशझोतात आलेले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चौधरी हे नगराळे यांचे गुरु आहेत. चौधरी यांच्या पासून त्यांनी ज्यूडो आणि बॉक्सिंगचे धडे गिरविले. येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय ते ज्यूडोचा सराव करायचे. त्यांनी ज्यूडोमध्ये ब्लॅक बेल्ट पटकावला आहे. तर महाराष्ट्रातर्फे खेळताना त्यांनी उत्तर भारतात बॉक्सिंगची नॅशनल चंपियनशिपही पटकावली आहे. पोलीस दलात रूजू झाल्यानंतर त्यांनी नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे एएसपी म्हणून सेवा दिली आहे. पोलीस महासंचालक बनणारे ते नागपूर विदर्भातील पहिलेच व्यक्ती ठरले आहे. या संबंधाने त्यांच्याशी लोकमत'ने आज संपर्क केला. "ज्युडो आणि बॉक्सिंगमध्ये चॅम्पियनशिप मिळवणारे नगराळे पोलीस दलाला कसे मजबूत बनविणार, असा थेट प्रश्न केला असता, आज जास्त बोलणे योग्य होणार नाही. मात्र राज्य पोलिस दलाला सर्वांगाने सक्षम बनविणार", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.खूप गर्व वाटतो : पुरुषोत्तम चौधरी हेमंत नगराळे राज्याच्या पोलिस दलाच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्याचा खूप गर्व वाटतो, अशी प्रतिक्रिया नगराळे यांना ज्यूडोचे धडे देणारे निवृत्त पोलिस अधिकारी पुरुषोत्तम चौधरी यांनी दिली. तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया नगराळे यांचे जावई आणि मध्य भारताचे निवृत्त मुख्य स्फोटक नियंत्रक रमेश भालेकर यांनी दिली
ब्लॅक बेल्ट चॅम्पियन डीजी म्हणतात, पोलीस दल सक्षम करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 10:59 PM