लोणावळा : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता सकुठुंब लोणावळ्याजवळील कार्ला गडावर येऊन कुलस्वामिनी आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. देवीची मनोभावे पुजा करत देवीची खणा नारळाने ओटी भरत आरती करण्यात आली.
मुख्यमंत्री ठाकरे गडावर दर्शनाकरिता येणार असल्याने कार्ला गडावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापुर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके हे गडावर उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव वेहेरगाव परिसर व गडावरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यत मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवण्यात आले होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, समन्वयक व उपनेते रविंद्र मिर्लेकर, स्विय सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सुलभा उबाळे, संपर्कप्रमुख बाळा कदम, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, माजी उपसभापती शरद हुलावळे, राष्ट्रवादीचे मावळ तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, सुरेश गायकवाड, वेहेरगावचे सरपंच सचिन येवले, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, बाळासाहेब फाटक, गबळू ठोंबरे, अंकूश देशमुख, दीपाली भिल्लारे, मनिषा भांगरे आदी उपस्थित होते.
श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने उध्दव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला तर एकविरा देवीच्या कळसाचा शोध लावणार्या पुणे ग्रामीण एलसीबी टिमचा उध्दव ठाकरे यांनी सत्कार केला. ठाकरे हे देवीच्या दर्शनाकरिता आले असल्याने त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.