नवी मुंबई : पोलीस आयुक्तपदाचा नुकताच पदभार स्वीकारलेल्या हेमंत नगराळे यांनी आयुक्तालयातील उकल न झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा नव्याने तपास सुरू करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली लागणार असून पोलीस आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी थेट नागरिकांशी संपर्क साधणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने कसे वागायचे यासंबंधी पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारला आहे. यानुसार बुधवारी त्यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधला असता शहरातील यापूर्वीच्या उकल न झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा नव्याने तपास सुरू करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नव्याने तपास करत असताना यापूर्वी ज्या अधिकाऱ्याने तपास केला त्याच्याऐवजी दुसऱ्या अधिकाऱ्याला तपासाची संधी देवून त्यालाही कौशल्य दाखवण्याची संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तर आवश्यकता भासल्यास गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार केले जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. पदभार स्वीकारल्यानंतर शहराचा आढावा घेण्याला सुरवात केली असून यापूर्वीच्या गुन्ह्यांवरुन वाहनचोरी व सोनसाखळीचोरी शहरातील चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले. अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी किंवा इतर कामासाठी आलेल्यांसोबत कर्मचारी सौजन्याने वागत नसल्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते. हे टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना नागरिकांशी कशा प्रकारे वागावे याचे धडे दिले जाणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.ज्यांना पोलीस सुरक्षा पुरवलेली आहे, त्यांना खरंच सुरक्षेची गरज आहे का? याची चौकशी केली जाणार आहे. सद्यस्थितीला पोलीस आयुक्तालयलातच अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे आवश्यक असेल त्यांनी पोलिसांच्या सिक्युरिटी कॉर्पोरेशनकडून सुरक्षा रक्षक घ्यावेत असेही त्यांनी सुचवले. येत्या काळात नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याकरिता ठरावीक दिवसांनी दोन्ही परिमंडळमध्ये बैठक घेवून जनतेच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला जाणार असल्याचेही नवनियुक्त आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. याप्रसंगी गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत, उपआयुक्त नितीन पवार, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर आदी उपस्थित होते.
उकल न झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा नव्याने तपास
By admin | Published: May 19, 2016 3:02 AM