- मिलिंद कुलकर्णी
जळगाव - कधीकाळी जनसंघात काम केलेल्या आमदार अनिल गोटे यांचा साडेचार वर्षांपूर्वीचा भाजपाप्रवेश धक्कादायक होता. मात्र, त्यांचे बंड अनपेक्षित नव्हते. पक्षीय, संघटनात्मक चौकट न मानवणाऱ्या गोटे यांची वाटचाल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंडाकडे झाली आणि हे बंड फसले, तरी आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नव्याने तुतारी हाती घेतली आहे.अभ्यासू, कार्यक्षम, परंतु तेवढेच आक्रमक, आक्रस्ताळे आणि शिवराळ भाषेचा मुक्तपणे वापर करणारे असे अनिल गोटे यांचे व्यक्तिमत्त्व धुळेकरांसह राज्याला परिचित आहे. जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांच्यासोबत त्यांच्या वर्तमानपत्रात काम करीत असतानाच राजकीय धडे त्यांनी गिरविले. पुढे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत सक्रिय झाले. समाजवादी पक्ष (महाराष्टÑ), लोकसंग्राम संघटना या स्वत:च्या पक्ष, संघटनेच्या माध्यमातून बेरोजगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलने उभारली. वाहतुकीला अडथळा ठरणारी खासगी आणि शासकीय अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी बेधडकपणे पाठपुरावा करण्याच्या स्वभावामुळे त्यांची नीडर लोकप्रतिनिधी अशी ओळख निर्माण झाली. पत्रकारितेचा अनुभव असल्याने अभ्यासूपणे अनेक प्रश्न विधिमंडळ आणि बाहेरदेखील लावून धरल्याने प्रशासनात वचक निर्माण झाला. धुळेकरांनी त्यांच्या या व्यक्तिमत्त्व आणि कार्यशैलीला उचलून धरत दोनदा अपक्ष तर गेल्या वेळी भाजपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून दिले. त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून देत पालिकेची सत्ता दिली होती.मूलत: बंडखोर स्वभाव असल्याने कोणत्याही पक्ष वा संघटनेत ते फारसे रमले नाहीत. पाताळगंगा प्रकल्पविरोधी आंदोलनात शरद जोशींशी बिनसल्यानंतर ते शेतकरी संघटनेतून बाहेर पडले. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी सख्य असले, तरी भाजपामध्ये तेव्हाही गेले नाही. बनावट मुद्रांक घोटाळ्यात प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीसोबत संबंधांवरून त्यांना ४ वर्षे कारागृहात काढावी लागली. या कारवाईनंतर शरद पवार व छगन भुजबळ यांचे ते कट्टर विरोधक झाले. भाजपा-शिवसेनेच्या जवळ गेले. २०१४च्या निवडणुकीत भाजपा नेते एकनाथराव खडसे यांच्या आग्रहाने ते भाजपाच्या तिकिटावर धुळ्यातून उभे राहिले आणि निवडून आले.भाजपामध्ये खडसेंचा उतरतीचा काळ सुरू होताच, गोटेंचे महत्त्व कमी झाले. धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा दबदबा वाढला. महापालिका निवडणुकीची सूत्रे आपल्याच हाती येतील, असा समज करून घेत गोटेंनी ८५ सभा घेतल्या, परंतु भामरे व रावल यांनी ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांना बोलावून घेत धुळ्यात बाजी मारली. तत्पूर्वी गोटे यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. आमदारकीचा राजीनामा देऊ केला आणि विधानसभेत अन्यायाचा पाढा वाचला, पण त्यांचे बंड फसले आणि धुळेकरांनी हेमा गोटे यांच्या रूपाने केवळ एक जागा त्यांच्या पारड्यात घातली.गोटे यांनी उतरविले होते लोकसंग्रामचे उमेदवारमहापालिका निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी गोटे यांनी लोकसंग्रामचे उमेदवार रिंगणात उतरविले होते. मनसेकडून समर्थन मिळविले होते. राष्टÑवादीचे माजी आमदार आणि कट्टर प्रतिस्पर्धी राजवर्धन कदमबांडे यांच्याशी हातमिळवणी केली होती, परंतु तरीही पराभव झाला. आता लोकसभा निवडणुकीत आघाडीअंतर्गत ही जागा कॉंग्रेसकडे आहे. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र आमदार कुणाल पाटील हे उमेदवार आहेत. पाटीलद्वयींवर टीका करणे गोटे यांनी कायम टाळलेले असताना बंडखोरी त्यांच्या पथ्यावर पडणारी ठरेल, असा कयास व्यक्त होत असला, तरी तूर्त त्यात फार तथ्य वाटत नाही.