नवी दिल्ली : राज ठाकरे यांच्या नेतृत्वात वेगाने होत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वाटचालीमागे भाजपचा वरदहस्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपने यापूर्वी रसद पुरविलेल्या राजकीय पक्षांची झालेली स्थिती लक्षात घेता मनसे या वटवृक्षाखाली किती काळ टिकाव धरू शकेल? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना राष्ट्रीय पातळीवर मिळत असलेल्या प्रसिद्धीमागे तसेच त्यांच्या जनसभांना होणाऱ्या अलोट गर्दीमागे भाजपची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी राज ठाकरे यांच्या जनसभा राष्ट्रीय न्यूज चॅनेलवर लाईव्ह दाखविल्या नव्हत्या. राष्ट्रीय पातळीवर राज ठाकरे यांची दखल घेण्यामागे भाजपच्या रणनीतीचा हातभार असल्याचे बोलले जात आहे.
पंजाबमध्ये भाजपने अकाली दलाशी अनेक वर्षे संसार केला. परंतु, भाजपने अकाली दलाला आता दूर केले, एवढेच नव्हे तर अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही नाही. बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या नेतृत्वातील लोजपाच्या साथीने भाजपाने राजकारण केले. आता लोजपाला विजनवासात जावे लागले. बिहारमधील जदयू पक्षालाही अस्तित्वाचा सामना करावा लागत आहे. आसाममधील बोडोलँड पीपल्स फ्रंटच्या मदतीने भाजपने आसाममध्ये पाय रोवले. बोडोलँड पीपल्स फ्रंटला भाजपसमोर अस्तित्व टिकविता आले नाही.
इतिहास काय सांगतो?भाजपच्या मदतीने पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणारे अमरिंदर सिंग यांना निवडून येणे शक्य झाले नाही.हा इतिहास लक्षात घेतल्यास राज ठाकरे खरेच भाजपसमोर अस्तित्व टिकवून महाराष्ट्रात एक शक्ती म्हणून टिकाव धरू शकतील काय? हा प्रश्न आहे.
राजकीय विजनवासात जावे लागलेभाजपच्या मदतीने होणारी मनसेची वाढ किती दिवस टिकून राहील, हा मुख्य प्रश्न आहे. कारण यापूर्वी भाजपची मदत घेतलेल्या पक्षांना राजकीय विजनवासात जावे लागले आहे.