ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - संध्याकाळी साडेसातच्या बातम्यांच्या लोकप्रियतेच्या बाबतीत खासगी वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत मुंबई दूरदर्शन खूपच आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नव्या बदलांमध्ये सह्याद्री वाहिनीवरच्या बातम्या अजूनही लोकप्रिय आहेत का? असा प्रश्न तुमच्या मनात डोकावला असेल तर हे त्याचं उत्तर हो असं आहे.
Broadcast Audience Research Council या स्वतंत्र संस्थेकडून दर आठवड्याची टेलीविजन माध्यमाची प्रेक्षकांची आकडेवारी प्रसिद्ध होत असते. त्यानुसार जर डिसेंबर २०१५ चा शेवटचा आठवडा बघितला तर दूरदर्शनवरच्या सायंकाळी सातच्या बातम्या जेव्हा ४७ लाखांहून अधिक घरांत पहिल्या गेल्या. त्याचवेळी मी मराठी, एबीपी माझा, झी २४ तास, आय बी एन लोकमत आणि जय महाराष्ट्र या पाचही वाहिन्या एकत्र केल्या तरी त्यांची एकत्रित आकडेवारी होती अवघी २५ लाख, म्हणजे एकट्या दूरदर्शनच्या साधारण निम्मीच! दूरदर्शन लोकप्रियतेमध्ये पहिल्या क्रमांकावर असताना, दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासची प्रेक्षक संख्या सह्याद्रीच्या एक पंचमांश एवढीच होती. कोणत्याही आठवड्याची आकडेवारी पहिली तरी सह्याद्री वाहिनीच्या बातम्या अव्वलच आहेत, आणि प्रेक्षक संख्येत अन्य वृत्त वाहिन्यांपेक्षा खूपच आघाडीवर आहेत.
रात्रौ साडेनऊच्या सह्याद्रीच्या बातम्याही लोकप्रियतेमध्ये अव्वलच असल्याचं आढळलं आहे. अनेक पाहुण्यांना बोलावून त्यांच्यात भांडणं लावायची आणि आपण मजा बघायची ही नव्या खासगी वाहिन्यांची स्टाइल प्रेक्षकांना भावली नसल्याची मार्मिक टिप्पणी एका दूरदर्शनप्रेमीने केली आहे.
चर्चेचं अखंड गुऱ्हाळ चालवून कुणालाच आपली भूमिका मांडू न देणं, त्यातही वृत्त निवेदाकानेच स्वत:च अखंड बोलत राहणं हे प्रेक्षकांना फारसं रुचत नसावं असंही मत व्यक्त करण्यात आलं आहे. त्यापेक्षा सह्याद्री वाहिनीवर रात्रौ साडेनऊच्या बातमीपत्रात एकाच पाहुण्याला आमंत्रित करून, त्याला सन्मानाने आपली मतं मांडायची पूर्ण मुभा असणं प्रेक्षकांना आवडत असावं, असा या आकडेवारीचा निष्कर्ष असावा.
'विश्वासार्हता' हा सह्याद्री वाहिनीवरच्या बातम्यांचा प्राण आहे, असं सह्याद्रीमध्ये काम करणारे सांगतात आणि बातमी एक वेळ उशीरा देऊ, पण खात्री करूनच देऊ हा इथला मूलमंत्र असल्याचं ठासून सांगतात.
बदलत्या कालानुरूप वेगाने न बदलता जुन्या पठडीनुसार बातम्या देत राहणं ही सह्याद्री वाहिनीवरील बातम्यांची चूक वाटत होती, पण नेमका तोच शहाणपणा ठरलाय! प्रेक्षक संख्येची आकडेवारी तरी हेच सांगतेय, असं मतही या क्षेत्रातल्या एकानं व्यक्त केलं आहे.