पुणे, दि. 10 - सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत.’ हे वाक्य उच्चारून छत्तीस वर्षे झाली. आज त्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे पुण्याहून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी दिल्या जाणा-या बातम्याच आज अचानक बंद करण्याचा निर्णय झाला. वाईट वाटले. त्या बातम्यांशी महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातल्या चावडीवरच्या मंडळींचं जिव्हाळ्याचं नातं होतं. गावात पेपर उशिरा येत असे. दूरदर्शनचं वाहिन्याचं जाळं पसरलेलं नव्हतं. त्यामुळे चावडीवर मध्यभागी ठेवलेल्या रेडिओभोवती गावकरी बातम्या ऐकायला बसत. मी कार्यक्रमाच्या निमित्तानं गावोगावी गेली, की तिथे मला गावकरी ही गोष्ट सांगत. रेडिओवरून सांगितलं, तरच खरी बातमी, अशी भावना असल्याने उत्सुकतेनं रेडिओ पुढे बसत. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातल्या गावोगावच्या सांस्कृतिक बातम्या-उपक्रमांना पुण्याच्या बातम्यात प्राधान्य असल्याने गावागावांत या बातम्या-ऐकणं मस्ट असे. मी टीव्हीवरून झळकण्यापूर्वी, माझं नाव आणि आवाज रेडिओच्या या बातम्यांनी महाराष्ट्रभर पोहोचला. त्यामुळे माझ्या मनात तर या बातम्यांचं स्थान महत्त्वाचं! त्याकाळी म्हणजे १९७४,७६,७८,८०,८१ या वर्षात मी सुधा नरवणे या अधिकृत निवेदिकेच्या सुट्टीच्या काळात बातम्या वाचत असे. त्या वेळी ‘सात’च्या बातम्यांसाठी पहाटे साडेचार वाजता रेडिओवर जावे लागे. यूएनआय, पीटीआयच्या मशिनवरच्या बातम्या फाडून, एडिट करून, भाषांतरित करून, साधारणपणे दहा मिनिटांसाठी पंधरा पाने तयार करून ठेवावी लागत.
‘इति वार्ता...’ हा संस्कृत बातम्यांचा शेवटचा शब्द झाला की फेडर आॅन करून आमचं ‘बातमीपत्र’ सुरू होई. अनेक जण बातमीच्या वेळेनुसार घड्याळ लावत. सकाळच्या धावपळीत घड्याळाच्या गजरासारखा बातम्यांचा उपयोग होई. बंदिस्त रुममध्ये माईकच्या पुढ्यात वाचत असताना, कधी कधी ‘सात’नंतर एखादी अगदी ताजी महत्त्वपूर्ण बातमी वृत्तसंपादक रुममध्ये टेबलावर सरकवत. न गोंधळता ती पटकन वाचावी लागे. ही बातमी अवघ्या महाराष्ट्राला आपल्या तोंडून कळतीय, याचा आनंद वेगळाच असे. स्थानिक बातम्यांना महत्त्व देणारे हे श्राव्य बातमीपत्र बंद व्हायला नको होते.
- सुधीर गाडगीळ. (लेखक हे प्रसिद्ध निवेदक आहेत)