मुंबई : लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी पत्रकारिता एक आहे. न्यायव्यवस्था या लोकशाहीच्या स्तंभातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही दाद मागण्यासाठी या स्तंभाकडे येऊन आपल्या व्यथा मांडाव्या लागल्या, इतके या स्तंभाचे महत्त्व आहे. हा स्तंभ जर इतका महत्त्वाचा असेल तर या स्तंभातील वृत्तपत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे एकदिवसीय अधिवेशन शनिवारी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते, या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते.फेरीवाला धोरण आले आहे. मात्र फेरीवाला कोण आणि वृत्तपत्र विक्रेते यातील फरक जर राज्यकर्त्यांना कळत नसेल तर त्याला अर्थ नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांचे ऋण माणणाºयांपैकी मी आहे. महापालिका आमच्या ताब्यात आहे. सरकारमध्ये आम्ही अर्धेमुर्धे आहोत. उद्या तुम्ही म्हणाल नाराज आहात तर सरकारमधून बाहेर पडा. मात्र विचार करून आपण एक भूमिका घेत असतो. ज्या वेळी भूमिका मांडायची त्या वेळी ती मी घेईनच आणि बेधडकपणे घेईन. वृत्तपत्र वाचण्याची सवय पिढ्यान् पिढ्या तशीच आहे. वृत्तपत्रांचे महत्त्व कुणी किती प्रयत्न केला तरी कमी होऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, दांगट न्यूजपेपर एजन्सीचे मालक बाजीराव दांगट, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाचे हरी पवार उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेता हा चौथ्या स्तंभाचा महत्त्वाचा घटक - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 5:26 AM