मुंबई : छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान करत वृत्तपत्राबाबत अपप्रचार करण्यात आला. याचा वृत्तपत्र विक्रेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत जाहीर केलेल्या अहवालात वृत्तपत्रामुळे कोरोना पसरत नाही, असे नमूद केले आहे. परंतु चला हवा येऊ द्या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळे यांनी वृत्तपत्राबाबत अपप्रचार केला. वृत्तपत्राची खिल्ली उडवण्यात आली आहे. साबळे हे या कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी या कार्यक्रमात वृत्तपत्राबाबत चुकीची माहिती दिली. त्यामुळे वृत्तपत्रांवर अवलंबून असणाऱ्या लाखो जणांच्या रोजीरोटीवर गदा येईल, असे सांगत वृत्तपत्र विक्रेते संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच या कार्यक्रमावर बंदीची मागणी केली आहे. राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार यांनी झी मराठीचा जाहीर निषेध केला आहे.अफवांवर विश्वास ठेवू नकाकोरोनाबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. वृत्तपत्रातून कोरोनाचा संसर्ग होतो ही एक अफवाच आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, डीएमईआरचे उपसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.झी मराठीने व्यक्त केली दिलगिरी‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाच्या ४ आॅगस्ट रोजी प्रसारित झालेल्या भागात झालेली चूक हेतूपुरस्पर केली नाही. कोणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे झी मराठीचे बिझनेस हेड निलेश मयेकर यांनी सांगितले.