मुंबई : मुंबईकरांनी कोणालाच स्पष्ट बहुमत न दिल्याने शिवसेना आणि भाजपापैकी महापौर कुणाचा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापौरपद आणि शिवसेनेशी युतीबाबत थेट भाष्य करण्याचे टाळून याबाबत पुढील निर्णय पक्षाच्या ‘कोअर कमिटी’च्या बैठकीत घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मतदारांचे आभार मानले. मुंबईतील विजयाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विकास आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मुंबईकरांनी आपला कौल दिला आहे. विकासासाठी झालेल्या या मतदानात मुंबईकर भाजपाच्या बाजूने उभा राहिला. आमच्या घटक पक्षातील उमेदवारांनी कमळाऐवजी अन्य चिन्हावर निवडणूक लढविल्याने तब्बल २० जागांवर फटका बसला. अन्यथा त्या जागांवरही विजय मिळाला असता. काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबाही जाहीर केला आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाच मुख्य पक्ष असल्याचा दावा केला. भाजपाला सेनेपेक्षा दोन जागा कमी मिळाल्या. मात्र, अपक्षांचा पाठिंबा आणि घटक पक्षांनी चिन्ह न वापरल्याने झालेले नुकसान अधोरेखित करत भाजपाच क्रमांक एकवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे भाजपा महपौरपद सहजासहजी सोडणार नसल्याचा इशाराच त्यांनी दिला.
( BMC ELECTION RESULT : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी )
( BMC ELECTION RESULT - 'कोण आला रे, कोण आला' शिवसेनेचा वाघ आला )