मुंबई- पुढच्या वर्षीची दिवाळी अयोध्येतील राम मंदिरात साजरी करू, असा विश्वास भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला आहे. राम मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते भाविकांसाठी खुलं केलं जाईल, असंही स्वामी म्हणाले आहेत.मंदिराच्या निर्माणासाठी लागणारी आवश्यक सामग्रीही तयार आहे. पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत राम मंदिर तयार असेल, राम मंदिराला मग स्वामी नारायण मंदिराप्रमाणे जोडणे बाकी राहील,’ असेही स्वामींनी स्पष्ट केलं आहे. राम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी नव्या कायद्याची आवश्यकता नाही. आम्ही राम मंदिरासाठी नवा कायदा करू शकतो. परंतु आम्हाला त्याची सर्व गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. त्याचं कारणही तसंच आहे. आम्ही हा खटला नक्कीच जिंकू असा आम्हाला विश्वास आहे, असंही स्वामी म्हणाले आहेत.अलाहाबाद उच्च न्यायालयात या विषयावर पूर्वीच खूप सखोल चर्चा झाली आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्डाकडे राम मंदिर पुनर्निर्माणात आडकाठी आणण्याचं म्हणावं तसं कारण आता राहिलं नाही. अयोध्येतील राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेला 6 डिसेंबर 2017ला 25 वर्षं पूर्ण होत असून, त्याच पार्श्वभूमीवर स्वामींच्या विधानाला राजकीय स्तरावर महत्त्व प्राप्त झालं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असे प्रतिपादन गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी केले होते.
पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करू, सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 4:09 PM