पुणे : कालपर्यंत राष्ट्रवादीच्या नावाने शंख फुंकणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे हे नेते अजित पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एवढेच नाही, तर हे ‘संबंध’ असेच राहिले तर पुढील विधानसभा एकत्र लढवू, तुम्ही किंगमेकर व्हा, असा शब्दही जानकरांनी दिला. त्यामुळे ही आगामी निवडणुकीपूर्वीची दिलजमाई आहे, की मंत्रिपदासाठी भाजपला दिलेला गर्भित इशारा? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने सोमवारी पुण्यातून सद्भावना यात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात ३६ आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली़ यानिमित्ताने अजित पवार यांच्यासोबत जानकर, मेटे, आणि खोत एकत्र आल्याने वेगळीच राजकीय ‘सद्भावना’ पाहायला मिळाली.राजकीय क्षेत्रात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो़ चांगल्या विचाराचे समर्थन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे़, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले. सदाभाऊ खोत म्हणाले, अजितदादांसोबत माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे. आम्ही सत्तेत आणि ते सत्तेच्या विरोधात असलो तरी नेमके कळेना, सत्तेत आम्ही आहोत की ते? अजित पवार काही अजून पळेनात. विरोधी पक्षाची जागा भरुन काढेनात.जानकर यांनी तर ‘लाल दिवा’ मिळत नसल्याची खदखदच व्यक्त केली. ते म्हणाले, काँग्रेस आणि भाजप एका माळेचे मणी आहेत़ ते काय करतील याचा नेम नाही. प्रसंगी शिवसेनेची सत्ता आली तरी चालेल, पण भाजपला धडा शिकवला पाहिजे. शिवसंग्रामचे मेटे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे युतीची महायुती झाली़ समान मुद्द्यांवर संमती झाली होती़ मंत्रिमंडळातील समावेशाचे आश्वासन दिले होते़ ते आता पूर्ण होत नाही.
...तर पुढची निवडणूक राष्ट्रवादीसोबत!
By admin | Published: March 08, 2016 2:40 AM