पुणे : कोकणसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी जोर कमी राहिला. पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात शुक्रवारी अनेक भागात मान्सून सक्रीय झाला असून मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात मुंबईत सांताक्रुझ येथे सर्वाधिक १४० मिमी पावसाची नोंद झाली. तर कोकणात अलीबाग येथे ४२ मिमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे ६५ मिमी तर पुण्यात २५ मिमी पाऊस नोंदविला गेला. विदर्भात बुलढाणा येथे ३१ मिमी तर अन्य शहरांसह मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. पुढील तीन दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडले. दि. २ जुलैला विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात राज्यात कोकणात मुरूड येथे सर्वाधिक १९० मिमी पावसाची नोंद झाली. म्हळसा, सांगे, देवगड, मंडणगड, वैभववाडी, खेड, माणगाव, रत्नागिरी, शहापुर, भिवंडी, चिपळूण, हर्णे, माथेरान, भिरा, कल्याण, कणकवली, पोलादपुर, सावंतवाडी, वेंगुर्ला या भागा १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला. तर मध्य. महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे १८० मिमी, इगतपुरी १२० मिमी व गगणबावडा येथे १०० मिमी पावसाची नोंद झाली. तसेच अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात पुर्णा, सिल्लोड, बदलापुर, मानवत या भागात जोरदार पाऊस झाला. तर तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातही पावसाचा जोर कमी होता. \