‘मुझे इस ट्रिपपर साथ ले जाते यार, अब क्यूं इतना जेलस बना रहे हो...,’ चेतन भगतने आपल्या मनातली चुटपुट अजिबात न लपवता ‘लोकमत वृत्तसमूहा’च्या एका नव्या संकल्पनेची ‘घोषणा’ केली.. तेव्हा पुण्यातल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच वाटले, आपणही कधीतरी ‘अशा’ प्रवासाला निघायला हवे...‘क्षणोक्षणी बदलत्या भारताच्या हृदय-रेषेला स्पर्श करत करत देशाच्या दक्षिण पायथ्यापासून थेट उत्तरेचा माथा गाठणारा प्रवास’ - ही संकल्पनाच थरारून टाकणारी! ‘लोकमत’च्या टीमने हा प्रवास केला आहे ‘दीपोत्सव’ या दिवाळी वार्षिकाच्या निमित्ताने!एन एच ४४!दक्षिणेची कन्याकुमारी आणि उत्तरेचे श्रीनगर अशी दोन टोके जोडणाऱ्या नॅशनल हायवे ४४ या महामार्गाचे बोट धरून केलेला तब्बल ३५ दिवसांचा प्रवास. पत्रकार-छायाचित्रकारांच्या टीमला या प्रवासात दिसलेला देश, भेटलेली माणसे, त्यांच्या सुख-दु:खाच्या कहाण्यांचा रोमांच हे सारे उलगडणार आहे लवकरच प्रसिध्द होत असलेल्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकात!- समकालीन मराठी पत्रकारितेत प्रथमच होत असलेल्या या विलक्षण साहसी आणि कल्पक प्रयोगाची घोषणा ख्यातनाम लेखक चेतन भगत यांनी पुण्यात केली. त्यांच्यासोबत लोकमत वृत्तसमुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. 1991 ते 2016 ही पंचवीस वर्षे म्हणजे स्वातर्योत्तर भारताच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा. जागतिकीकरणाची पंचविशी गाठणार्या ‘ग्लोबल’ भारताची ‘लोकल’ रहस्ये शोधण्यासाठी लेखक-विचारवंतांना नव्हे, तर रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसांना भेटण्याचा प्रयोग ‘एन एच 44’च्या निमित्ताने ‘लोकमत’ने केला आहे.दक्षिणेची शांत राज्ये, तेलंगणातला ताजा राग, उत्तर प्रदेश-हरयाणातली घुसमट, ‘उडता पंजाब’ची झुलसती नशा, चंबळच्या खोर्यातला थरार आणि जम्मू-काश्मीरमधली धुम्मस असे सारे सारे या प्रवासात भेटते... आणि भेटते प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी झुंजणारी, मागे न हटणारी हिंमत!!...अवघ्या देशाला कवेत घेणाऱ्या एका प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव : येत्या काही दिवसात ‘दीपोत्सव’मधून!
एन एच ४४ : ‘दीपोत्सव’च्या पानांमध्ये उलगडणार ‘ग्लोबल’ भारतातल्या ‘लोकल’ मुला-माणसांच्या कहाण्या
By admin | Published: October 14, 2016 3:46 AM