मुंबई - निवडणुकीत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेल्या भाजप खासदारा आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा अडचणीत सापडल्या आहे. विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने त्यांना चांगलाच झटका दिला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयात आठवड्यातून एकदा उपस्थित राहण्यासाठी देण्यात आलेल्या, निर्णयाविरोधात त्यांनी याचिका दाखल करत कायमची सुटका करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र एनआयए न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
भोपाळ मतदार संघातून प्रज्ञासिंह ह्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे संसदेत संसदीय कामकाजासाठी दैनंदिन उपस्थिती आवश्यक असल्याने न्यायालयात आठवड्यातून एकदा हजर राहता येणार नाही, त्यामुळे सुनावणीमधून कायमची सुटका करावी अशी मागणी याचिकेतून त्यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच, प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयात आठवड्यातून एकदा उपस्थित राहण्यासाठी सक्तीने आदेश देण्यात आले आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींनी आठवड्यातून एकदा न्यायालयात उपस्थित रहावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र ठाकुर यांच्या विनंतीवरून त्यांना गुरुवारी हजर न राहण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश कायमचे रद्द करता येणार नसल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.