केंद्र सरकार व भाजपसोबत परमबीर सिंह यांचे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते. त्यातूनच त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप केले. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा आता सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, एनआयएला एक दिवस खरे काय ते सांगावे लागेल, सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी केले आहे.
अनिल देशमुख यांना पैसे दिले नसल्याचा जबाब सचिन वाझे याने चांदिवाल आयोगासमोर नोंदविल्याची बाब समोर आल्याचे सांगून नवाब मलिक म्हणाले की, परमबीर सिंह यांनी जिलेटीनचे कांड केले. या प्रकरणात एनआयएकडे जबाब नोंदविल्यानंतर ते फरार झाले. मात्र आता एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण हे सांगितले पाहिजे. परंतु, एनआयएने अद्याप चार्जशीट का दाखल केली नाही, परमबीर सिंह यांच्या घरी शर्मा व वाझे यांची बैठक का झाली, असे प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केले.
या प्रकरणात अनेकांची नावे घेतली जातात, वाहनचालकाचे नाव घेतले जात आहे. त्याचा जबाब सांगितला जातो, इनोव्हा गाडीची चर्चा होते. मात्र सिंह यांच्या नावाची चर्चा होत नाही, असा आरोप त्यांनी केला. धमकीचे पत्रमंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र आले आहे. समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही तर घरावर हल्ला करण्याची धमकी अश्लाघ्य भाषेतून देण्यात आली आहे. पत्र लिहिणाऱ्याने आपण नौदलाचे अधिकारी असल्याची बतावणी केली आहे. याप्रकरणी मलिक यांनी राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.