अमरावती : राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अवैध दारू विक्री, बेकायदेशीर मद्य वाहतुकीस ‘ब्रेक’ लावण्यासाठी सीमेवर रविवारी रात्रीपासूनच नाकाबंदी चालविली आहे. यात वेगवेगळे चार फिरते पथक नेमण्यात आले आहेत. एक्साईजचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनात निवडणुकांच्या काळात अवैध दारू विक्री तसेच वाहतुकीस लगाम लावण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून दारूचे वाटप मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र तीन दिवसांपूर्वीच दारू विक्री बंदचे धोरण शासनाचे आहे. या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यप्रदेश अथवा वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून जिल्ह्यात दारूचा साठा येणार असल्याच्या पार्श्वभूमिवर नाकाबंदी करण्यास प्रारंभ केला आहे. वाहनांची तपासणी करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून सहा महिला पोलीस कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहे. पथकात एक निरीक्षक, तर दोन दुय्यम निरीक्षकांचा समावेश आहे. हे विशेष पथक राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स, पानटपरी आदी प्रतिष्ठानांची तपासणी करीत आहेत. या पथकाच्या सोबतीला वनविभाग, पोलीस, महसूल व महापालिकेची चमू कार्यरत आहे. मोर्शी, वरुड, परतवाडा, धामणगाव रेल्वे, तिवसा आदी प्रमुख मार्गावर ये - जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विशेषत: मध्यप्रदेश व वर्धा जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवली जात आहे. तसेच शहरी भागातून ग्रामीणमध्ये येणारी वाहने, दूध विक्रेते आदींवर करडी नजर ठेवली जाणार आहे. राज्य मार्गावरील सीमावर्ती नाक्यांवर ‘एक्साईज’चे अधिकारी वाहनांची तासणी करीत आहेत. रविवारी मध्यरात्री अवैध दारू वाहतूक करणारे चार जण ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
‘एक्साईज’ची रात्री नाकाबंदी
By admin | Published: February 20, 2017 8:57 PM