मुंबई : गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी अखेर मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांती घेतल्याने बेजार झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. असे असले तरीही शनिवारी आणि रविवारी शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, काहीसा दिलासा मिळालेल्या मुंबईकरांना आणखी काही दिवस पावसाचा जाच सहन करावा लागणार आहे. दरम्यान, दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असतानाच शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा पावसाने सर्वत्र मुसळधार हजेरी लावली. मध्य मुंबईसह परेल, गोरेगाव आणि मालाडमधील परिसरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. ऐनवेळी दाखल झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांची मात्र तारांबळ उडाली.मध्य भारत, पश्चिम बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे मागील आठवड्याभरापासून राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबईतही सलग आठ दिवसांपासून सातत्याने सरीवर सरी कोसळत असून, पावसामुळे मुंबईकर मेटाकुटीला आले आहेत. गुरुवारी रात्री जोर धरलेल्या पावसाने रात्रभर मारा केल्यानंतर शुक्रवारी दिवसभर मात्र विश्रांती घेतली. शहरासह उपनगरात पडलेल्या उन्हामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत झालेल्या पावसामुळे शहरात १, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण ५ ठिकाणी घरांच्या भिंतीचा भाग पडला. शहरात ४, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात ३, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ६ अशा एकूण १० ठिकाणी झाडे पडली. (प्रतिनिधी)२४ तासांचा पाऊस (मिमी)कुलाबा ४५.२सांताक्रुझ ३९.७२२ सप्टेंबरपर्यंतचा पाऊस (मिमी)कुलाबा २३२४सांताक्रुझ २७९१वार्षिक सरासरीकुलाबा २१८४सांताक्रुझ २४५३पावसाची टक्केवारीकुलाबा १०६.४१सांताक्रुझ ११३.८१
विश्रांतीनंतर रात्री कोसळधारा
By admin | Published: September 24, 2016 1:41 AM