ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 03 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री "मेट्रो 3" च्या कामाची पाहणी केली. त्यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्प सुरु असलेल्या पाच ठिकाणांचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांना अडथळा होऊ नये म्हणून मेट्रोच्या कामाची पाहणी रात्रीच्या वेळी करण्याचे ठरविले होते. या कामाच्या पाहणीचा दौरा त्यांनी आझाद मैदानापासून रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास सुरू केला.
मेट्रोच्या बांधकामासाठी प्रीकास्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम करणे सोपे होत आहे. देशातील इतर मेट्रोच्या कामांपेक्षा मुंबईतील मेट्रोचे बांधकाम मोठ्या जलदगतीने सुरु असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईमध्ये "मेट्रो 3" च्या अंतर्गत कुलाबा-बांद्रा-सिप्झ असा साडे तेहत्तीस किलोमीटरचा भूमिगत मेट्रो मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. यामार्गावर 27 स्थानके असणार आहेत. त्यापैकी 26 स्थानके भूमिगत असतील. तसेच, कुलाबा ते सिप्झ हे अंतर या भुयारी मेट्रोने केवळ 50 मिनिटांत पार करता येईल.