उपराजधानीत १८० झाडे पडली : २४ तासात १४०.१० मि.मी.नागपूर : गेल्या रविवारपासून संततधार पाऊ स सुरू आहे. बुधवारी सकाळी जोराच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्याने शहरात ठिकठिकाणी तब्बल १८० झाडे पडली. काही ठिकाणी रहदारीच्या मार्गावर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगळवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता. काहींच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. दुपारी पावसाने उसंत घेल्याने लोकांना दिलासा मिळाला. गेल्या २४ तासात १४०.१० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. चुकीचे कॉल!शहरातील विविध भागात पाणी शिरल्याच्या, झाडे पडल्याची सूचना अग्निशमन विभागाला मिळताच मदतीसाठी विभागाच्या जवानांना पाठविले जाते. परंतु गेल्या दोन दिवसात अनेक चुकीचे कॉल आले. परंतु धावपळ करून घटनास्थळी पोहोचण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, अशी माहिती अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. बेसा भागात पाणी साचलेबेसा भागात सलग दुसऱ्या दिवशीही अनेक वस्त्यांत पाणी साचले होते. चिंतामणीनगर येथे पाणी साचल्याने अनेकांची वाहने पाण्यात अर्धवट बुडाली होती. तसेच हुडकेश्वर मार्गावर पाणी साचले होते. पिपळा फाटा-धनगरवाडी मार्ग, पिपळा-नेहरूनगर मार्गावर पाणी साचल्याने वाहनधारकांना त्रास झाला.दोन भावंडावर कोसळले झाड रस्त्याच्या कडेला असलेली अनेक मोठी झाडे कोसळून पडली. यातच दुचाकीने जात असलेल्या दोन तरुण भावंडांवर झाड पडले. यात मोठा भाऊ जागीच मरण पावला तर लहान गंभीर जखमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशुतोष कुंभारे (१८) रा. सुदामनगरी पांढराबोडी असे मृताचे नाव आहे तर स्वप्निल कुंभारे (१६) असे जखमीचे नाव आहे. आशुतोष हा मोठा भाऊ होता. बुधवारी स्वयंपाकाचा सिलिंडर संपल्याने सिलिंडरचा नंबर लावण्यासाठी आशुतोष लहान भाऊ स्वप्निलला घेऊन आपल्या दुचाकी स्टनर गाडीने (एम.एच. ३१- डीके ६८६५) ने जात होता. दरम्यान ११.१६ वाजताच्या दरम्यान कुसुमताई वानखेडे सभागृहाजवळ अलंकार टॉकीजसमोर अचानक एक जुने झाड त्यांच्या गाडीवर पडले. यात आशुतोष व त्याचा भाऊ स्वप्निल गंभीर जखमी झाले. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. दोघांनाही तातडीने रामदासपेठ येथील क्रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आशुतोषला तपासून मृत घोषित केले. स्वप्निलची प्रकृती अत्यवस्थ आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे.महापालिकेच्या अग्निशमन दलाला झाड पडल्याची माहिती मिळताच स्टेशन आॅफिसर पी.एन. कावळे,. के. आर. कोठे, आर. बी. बरडे यांच्यासह शालिक कोठे, आनंद गायधने, दत्तात्रय सातपुते, रमन बैसवारे, अशोक घवघवे, अशोक पाटील आदी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांनाही सिम्स रुग्णालयात दाखल केले. झाड पडल्याने रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. कुटुंबातील कर्ता गेलाअभिषेक व स्वप्नील यांचे वडील विजय कुंभारे यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात दोन भाऊ व आई आहे. अभिषेक मोठा असल्याने तोच कर्ता होता. त्याचा मृत्यू झाला असून लहान भाऊसुद्धा अत्यवस्थ आहे. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. मोठ्या मुलाचा मृत्यू तर लहान अत्यवस्थ असल्याने आईला धक्का बसला आहे.
रात्रभर धारा, सकाळी वारा
By admin | Published: July 24, 2014 1:08 AM