मुंबई : खासगी ट्रॅव्हल्सकडे आकर्षित झालेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे खेचण्यासाठी एसटी महामंडळाकडून नव्या सुविधा सुरू करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने प्रवाशांना एसटीच्या रातराणीचा जास्तीतजास्त प्रवास ‘वातानुकूलित’(एसी) घडवण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळ स्वत:च्या मालकीच्या ५00 एसी बस विकत घेणार असून, त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यातीलच बहुतांश बसगाड्या या रातराणी म्हणून चालविण्याचे नियोजन महामंडळाकडून केले जात आहे. लांब पल्ल्याचा प्रवास शक्यतो रात्री करण्याचा प्रवाशांचा कल लक्षात घेऊन रातराणी सेवा वाढविण्यावर एसटी महामंडळाकडून भर दिला जात असल्याचे नुकतेच स्पष्ट करण्यात आले. रातराणी सेवा वाढवताना दिवसा धावणाऱ्या अनावश्यक लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून त्याऐवजी रातराणी सेवेला प्राधान्य देण्याचे धोरण एसटी महामंडळाने अवलंबविले आहे. त्यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार लांब पल्ल्याची रातराणी सेवा रात्री उशिरा निघून सकाळी लवकर इच्छित स्थळी कशा पोहोचतील, असे वेळापत्रकही बनविले जात आहे. सध्या राज्यात ३१४ मार्गांवर एसटीच्या ६२६ रातराणी फेऱ्या धावतात. त्याचे एकूण भारमान हे ६२ टक्के असून, सकाळच्या फेऱ्यांशी तुलना केल्यास ते ४ टक्के अधिक आहे. एकूणच रातराणीला प्रतिसाद आणखी वाढावा यादृष्टीने एसटीकडून नियोजन केले जात असून, त्यासाठी एसी बस चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महामंडळाच्या ताफ्यात स्वत:च्या मालकीच्या ५00 एसी बसेस येत्या काही महिन्यांत टप्प्याटप्प्यांत दाखल होतील. महामंडळ त्या बसगाड्या स्वत:च्या कारखान्यात न बांधता बाहेरून बांधून घेणार आहे. या बसगाड्यांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ५00पैकी बहुतांश बसगाड्या या रातराणी सेवेसाठी चालविण्यात येतील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली. त्यामुळे खासगी बस कंपन्याकडे आकर्षित झालेला प्रवासी पुन्हा एसटीकडे येईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)जुन्या दरातच एसी रातराणी सेवा नव्या वर्षात जास्तीतजास्त एसी रातराणी बस चालविताना त्या मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या अन्य बसप्रमाणेच भाडे आकारण्याचा विचार केला जात आहे. मुंबई ते कोल्हापूर पहिली बस १ आॅक्टोबरपासून मुंबई ते कोल्हापूर एसी बस सुरू होत आहे. ही सेवा तात्पुरती असून, ती पहिली एसी रातराणी सेवा ठरली आहे. सध्या मुंबई ते पुणे, ठाणे ते पुणे, पुणे ते औरंगाबाद आणि पुणे ते नााशिक अशा शिवनेरी बस धावतात. त्यांना साधारण चार ते पाच तास लागतात. रात्री ७ नंतर सलग पाच तासांपेक्षा जास्त प्रवास घडवणाऱ्या सेवा एसटीच्या रातराणी म्हणून समजल्या जातात. त्यामुळे शिवनेरी बस या रातराणीत मोडत नसल्याचे सांगण्यात आले. रातराणी सेवा वाढविण्याचे नियोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रातराणी सेवा एसी चालविण्याचा निर्णय घेतला असून, तो नवीन वर्षात अंमलात आणू. यासाठी स्वत:च्या मालकीच्या ५00 एसी बस घेण्यात येणार असून, यातील काही बस रातराणी म्हणून चालविल्या जातील. - दिवाकर रावते, परिवहनमंत्री
रातराणीचा प्रवास ‘वातानुकूलित’
By admin | Published: September 30, 2016 3:45 AM