निलेश लंकेंना महायुतीच्या मंत्र्याकडून त्रास; शरद पवारांसोबत जाण्यावर अजितदादांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 01:01 PM2024-03-14T13:01:06+5:302024-03-14T13:05:48+5:30
आम्ही आता शरद पवारांचा फोटो वापरत नाही. आम्ही चव्हाण यांचा सुसंस्कृत नेते म्हणुन फोटो वापरतो, असा खोचक टोला लगावला.
बारामतीमध्ये शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बंड पुकारल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी गोटात चिंतेचे वातावरण आहे. यावरून अजित पवार यांनी महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांनी एकोपा ठेवण्याची गरज आहे, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीतील जागावाटपावर भाष्य केले. पहिल्या मिटींग मध्ये ८० टक्के कोणी कुठल्या जागा लढवायच्या याचा निर्णय झाला होता. २० टक्के जागांचे वाटप पेंडिंग ठेवलेले आहे. परंतु पुढच्या मिटिंगमध्ये हा निर्णय होईल. हा निर्णय झाला की सगळे जण आपाआपल्या जागा घेतील, असे पवार म्हणाले.
निलेश लंके शरद पवारांच्या गटात जाणार असल्याचे विचारले असता पवारांनी लंके नाराज असल्याचे मान्य केले. तेथील स्थानिक राजकारणामुळे लंके नाराज आहेत. त्यांच्या सोबत माझे काल बोलणे झाले. त्यांनी आमच्या महायुतीतल्या एका मंत्र्याविरोधात तक्रार केली आहे. या मंत्र्यामुळे अडचणी येत आहेत, त्रास होत असल्याचे सांगितले आहे. यावर मी त्यांना आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तुमच्या येथील मंत्री असे एकत्र येऊन चर्चा करू, काही प्रश्न, त्रास असेल तर आपण सोडवू असे सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले. समोरच्या लोकांकडे उमेदवार नसल्यामुळे अशा वेगवेगळ्या बातम्या पसरवत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाने शरद पवारांचा फोटो वापरत असल्यावरून झापल्याबाबत अजित पवारांना विचारले असता. आम्ही आता शरद पवारांचा फोटो वापरत नाही. आम्ही चव्हाण यांचा सुसंस्कृत नेते म्हणुन फोटो वापरतो, असा खोचक टोला लगावला.