- लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर (जि. जळगाव) : बकऱ्या चारायला न नेल्याने वडील रागावतील या भीतीतून राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारविजेता नीलेश भिल्ल (वय १२) याने सोमवारी रात्री घर सोडले. गुरुवारी रात्री तो पुन्हा घरी आला. शिळे-पाके खाऊन निघाल्यानंतर त्याचा भाऊ गणपत (वय ७) त्याच्या मागे लागल्याने त्यालाही नीलेश सोबत घेऊन गेला. त्यानंतर हे दोघे बेपत्ता आहेत.दोन्ही भावांचा अपहरण झाल्याच्या भीतीतून त्यांच्या पालकांनी शोध सुरू केला आहे. त्यासाठी ज्योतिष्याचा आधार घेतल्याची माहिती मिळाली़ मुक्ताईनगर पोलिसांत अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कोथळी येथील आशापुरी भागातील एका कुडाच्या झोपडीत भिल्ल कुटुंब राहते. घरात अठराविश्वे दारिद्य्र.. नीलेशने दोन वर्षांपूर्वी एकादशीच्या दिवशी गावातील मुक्ताई मंदिराच्या बॅकवॉटरमध्ये विदर्भातील एका बालकाला बुडताना वाचवले होते. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देऊन त्याला गौरवले होते़ नीलेशच्या झोपडीला आजही दरवाजा नाही. कुडाचेच हे घर आहे. सोमवारी नीलेश नदीवर गेला होता. बकऱ्या न चारल्याने वडील रागावतील म्हणून रात्री त्याने घर सोडले़ त्यानंतर गुरुवारी तो पुन्हा आला आणि जाताना त्याच्यासोबत गणपतही गेला. विशेष म्हणजे, नीलेशने शर्ट न घालता घर सोडल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले़ ज्योतिष्याची घेतली मदतपोटचा गोळा अचानक बेपत्ता झाल्याने आई-वडिलांच्या मनात शंकांनी घर केले आहे. मुलगा नेमका कोणत्या दिशेने गेला, याची त्यांनी ज्योतिष्याकडे विचारणा केली. नीलेश बऱ्हाणपूरच्या दिशेने गेल्याने सांगण्यात आल्याने आई-वडील त्या दिशेने तपास करीत असल्याची माहिती मिळाली. नीलेशचा मधला भाऊ बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन गेल्याने दुपारी घरी कुणीही नव्हते.दुरुस्तीअभावी सायकल पडूननीलेशला पुरस्कार मिळाल्यानंतर सायकल भेट मिळाली होती. मात्र, मध्यंतरी ती खराब झाली. दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने ही सायकल झोपडीच्या छतावर टाकण्यात आल्याचे दिसून आले़