मुंबई : राज्यावर मोठ्याप्रमाणावर कर्जाचा बोजा असून, केंद्राने २ वर्षांसाठी महसूल माफ केला तर महाराष्ट्र कर्जमुक्त होऊ शकतो. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्राला सहाय्य केले पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. तर याच मुद्द्यावरून आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. राणे यांनी ट्वीट करत, भीक का मागताय ? असे म्हणत ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरवर्षी केंद्र जेवढा महसूल गोळा करते. त्यापैकी ३६ ते ४४ टक्के मुंबई आणि महाराष्ट्र केंद्राला महसूल देते. दीड ते पावणे दोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला, तरी अख्खे राज्य कर्जातून बाहेर पडू शकते. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्राला सहाय्य केले पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी विधान भवनात अधिवेशन संस्थगित झाल्यांनतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.
तर उद्धव ठाकरेंच्या याच मागणीवरून निलेश राणेंनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. "काय पोरकट मुख्यमंत्री आहे. प्रत्येक राज्यातून मिळणार महसूल केंद्र सरकार पुन्हा त्याच राज्यांना विविध मार्गाने परत पाठवत असतात. त्यामुळे महाराष्ट्र ज्या प्रमाणात केंद्राला महसूल पाठवत आहे, त्याच प्रमाणात तो परत आला पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी करायला पाहिजे. तसेच अशा मागण्या करून भिक का मागतायत'' असे म्हणत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.