रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलेले असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचेमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांना जोरदार धक्का बसला आहे. स्वाभिमान पक्षाला उत्तर रत्नागिरीत खिंडार पडले असून जिल्हाध्यक्षांसह 18 पदाधिकाऱ्यांनी रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
स्वाभिमानचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, गुहागर व खेड तालुकाध्यक्षांसह १८ पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि खासदार विनायक राऊत, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रत्नागिरी भागात हा स्वाभिमान पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र साळवी, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे तसेच स्वाभिमानच्या महिला जिल्हाध्यक्ष मेघना मंगेश शिंदे, स्वाभिमान कातकरी समाज जिल्हाध्यक्ष विलास निकम, स्वाभिमान पदाधिकारी दिप्ती चव्हाण, विलास जाधव, विश्वनाथ शेट्ये, प्रकाश निवाथे, राजेंद्र साळवी, राजेंद्र (बाबा) शिंदे, शशिकांत निकम, संजय जगताप, दीपक चव्हाण, कपिल काताळकर, मनोज पवार, शशिकांत शिंदे, निता निकम यांचा समावेश आहे.
तर स्वाभिमानचे युवक जिल्हाध्यक्ष वैभव विरकर यांनीही पक्षाचा राजीनामा दिला असून ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.