चिपळूण/ठाणे : रत्नागिरीतील मराठा आरक्षण सभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी पहाटे माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह पाचजणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सावंत यांच्यावर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी हे प्रकरण अधिक तपासासाठी चिपळूण पोलिस ठाण्याकडे वर्ग झाले आहे.मराठा आरक्षणाबाबतच्या राज्यव्यापी दौऱ्याचा प्रारंभ माजी खासदार नीलेश राणे यांनी रविवारी (दि. २४) रत्नागिरीतील सभेने केला. या सभेला चिपळूण तालुकाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक संदीप सावंत उपस्थित नव्हते. याच गोष्टीचा राग मनात धरून रविवारी (दि. २४) रात्री नीलेश राणे आणि तुषार, मनीष, अण्णा आणि कुलदीप खानविलकर हे कार्यक्रम संपल्यानंतर सावंत यांच्या घरी आले. त्यांना खाली बोलावून जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले.सोमवारी (दि. २५) त्यांना मुंबई, जोगेश्वरी येथे सोडून देण्यात आले. त्यानंतर सावंत यांनी त्यांचे मावस भाऊ विनायक सुर्वे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. त्यांनी सावंत यांना सोमवारी रात्री ठाण्यात आणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. सावंत यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, अंग काळेनिळे झाले आहे, असे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. आपल्याला हॉकी स्टीक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची तक्रार जखमी सावंत यांनी ठाणे नगर पोलिसांकडे केल्याने याप्रकरणी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला.दरम्यान, सावंत यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असले तरी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अंगावरही वळ उठले आहेत. अजून काही रिपोर्ट यायचे आहेत, असे संदीप सावंत यांच्या पत्नी शिवानी यांनी स्पष्ट केले.सायंकाळी ही तक्रार ठाणे पोलिस स्थानकाकडून चिपळूणकडे वर्ग करण्यात आली आहे. उशिरापर्यंत त्यावरील प्रक्रिया सुरू होती. चिपळूणचे पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. या प्रकारामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नीतेश राणे, नीलमतार्इंना फोनआई आजारी असल्याने संदीप हे कार्यक्रमास गेले नाहीत, असे त्यांच्या पत्नी शिवानी यांनी सांगितले. त्याच रात्री नीलेश राणे घरी आले आणि त्यांना नेहमीप्रमाणे घेऊन गेले. म्हणून त्या गोष्टीकडे सावंत कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले; परंतु सकाळ झाली तरी पती घरी न आल्याने आम्ही काळजीत होतो. योगायोगाने त्यांचा मोबाईल घरीच राहिल्याने आमदार नीतेश राणे यांना सोमवारी सकाळी ६ वाजता फोन केला. त्यानंतर नारायण राणे यांच्या पत्नी नीलमतार्इंना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यावर नीलमतार्इंनी तुझा नवरा सुखरूप घरी येईल, त्याला काही होणार नाही, असे आश्वासन दिल्याचे शिवानी यांनी सांगितले. हा प्रकार गैरसमजुतीतून झाला असल्याचेही त्या म्हणाल्या. ‘‘ मंगळवारी पहाटे अपहरण आणि मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा चिपळूण पोलिसांकडे वर्ग केला. याबाबतची कागदपत्रे तातडीने रवाना करण्यात आली.’’- एम. व्ही. धर्माधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणेनगरसंदीप सावंत याने आपल्याकडे घर बांधण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. ते त्याला मिळाले नाहीत म्हणून विरोधकांच्या साथीने हा घाणेरडा डाव रचण्यात आला आहे. रत्नागिरीतील मराठा समाजाच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व पुढेही राज्यभरातील सभांना प्रतिसाद मिळेल, या भीतीमुळेच सेना -भाजपवाल्यांनी संदीप सावंतला हाताशी धरून हे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे.- नीलेश राणे, माजी खासदारसंदीप सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गोविंदराव निकम यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र,त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून चिपळूण युवक काँॅग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. याचदरम्यान, नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर ते राणे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने त्यांच्या गळ्यात चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडली. त्यांनी २०१४ मध्ये गुहागर मतदारसंघातून थेट विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. नारायण राणे हे आम्हाला आई-वडिलांप्रमाणे आहेत. ते नेहमी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. या प्रकरणात देखील त्यांनी आमच्या पाठीशी उभे राहावे व आम्हाला न्याय द्यावा.- शिवानी संदीप सावंत‘‘ मंगळवारी पहाटे अपहरण आणि मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा चिपळूण पोलिसांकडे वर्ग केला. याबाबतची कागदपत्रे तातडीने रवाना करण्यात आली.’’- एम. व्ही. धर्माधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ठाणेनगर
नीलेश राणेंसह पाचजणांवर गुन्हा
By admin | Published: April 27, 2016 12:14 AM