मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विद्येची देवता सरस्वतीवर केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिले नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवले नाही, त्यांची पूजा कशाला करायची?' असे विधान आमदार छगन भुजबळांनी केले आहे. भुजबळांच्या या विधानावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी भुजबळांच्या विधानावरुन त्यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. निलेश राणेंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लोकमतने छगन भुजबळांवर केलेली एक बातमी शेअर केली आहे. या बातमीसोबत राणेंनी लिहिले की, ''नोटांवर पण फक्त गांधीजी कशाला, सगळे महापुरुष पाहिजे. हिंदू धर्मामध्ये पारंपारिक श्रद्धेला वेगळे महत्त्व आहे. पण, ते पवार साहेबांच्या सोबत असणाऱ्यांना समजणार नाही. हे वाक्य ओवेसी बोलण्यासारख आहे,'' अशी टीका राणेंनी भुजबळांवर केली आहे.
राम कदमांचे टीकास्त्र
भुजबळांच्या वक्तव्यावर भाजप नेते राम कदम यांनीही टीका केली. ते म्हणाले की, 'आज यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकतात. उद्या मंदिरेही खटकतील. मंदिरे कशाला हवीत. ती पाडून टाका असंही म्हणतील. सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत. परंतु राष्ट्रवादीची ही पद्धत कुठली? हिंदुत्वाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीला का राग आहे? यांच्यासोबत पेग्विन सेनेचे नेते आहेत त्यांची काय भूमिका आहे? हिंदु देवी देवतांचा अपमान राष्ट्रवादीने केला आहे त्यांनी माफी मागायला हवी,' असे राम कदमांनी म्हटले.
काय म्हणाले छगन भुजबळ?अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना भुजबळ म्हणाले होते, 'शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिले नाही, ज्यांनी आपल्याला शिकवले नाही. असेलच शिकवले तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवले आणि आम्हाला दूर ठेवले, त्यांची पूजा कशासाठी करायची?' असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.