मुंबई - मुंबईतील बीकेसी परिसरात शिवसेनेने पीक विमा कंपन्यांविरोधात काढलेल्या मोर्चावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, राज्यातील खासगी पीक विमा कंपन्यांना १५ दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मुदत दिली होती. अन्यथा १५ दिवसांनी पुन्हा मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला होता. तर उद्धव ठाकरे यांना डेडलाईनची आठवण करून देत माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
गेल्या महिन्यात खाजगी पीक विमा कंपनांच्या विरोधात शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता. यावेळी खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. यावेळी उद्धव यांनी, राज्यातील खासगी विमा कंपन्यांना १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर आगामी १५ दिवसांच्या काळात कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या बोर्डावर झळकलीच पाहिजेत अशी सूचना उद्धव यांनी बँकांना केली होती. मात्र प्रत्यक्षात आजही अनेक शेतकरी पीक विमा आणि कर्ज माफी पासून वंचित असल्याचे समोर आले आहे.
यावरूनच निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेल्या डेडलाईनच काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना ४०० कोटी मिळवून दिले म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पुरावे द्यावेत असे सुद्धा निलेश राणे म्हणाले. यावेळी त्यांनी एका शेतकऱ्याचे २०१८ मधील बँकेचे तपशील ट्विट करत, पुरावे द्यायचे असतील तर असे द्या, म्हणजे खरं खोटं कळेल असा खोचक टोला निलेश यांनी शिवसेनेला लगावला.
सत्तेत असून ही नेहमीच शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्ज माफिवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात मात्र अजूनही सरसकट कर्ज माफी झाली नसून अनेक शेतकरी कर्ज माफी पासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यात सनेने दिलेल्या १५ दिवसाच्या डेडलाईन नंतर काही हालचाली होतील अशी, अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र शिवसेनेला त्यांनी दिलेल्या डेडलाईनचा विसर तर पडला नाही ना ? असा प्रशन उपस्थित होत आहे.