महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष भुकेलेला; खातेवाटपावरून निलेश राणेंची ठाकरे सरकावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 04:10 PM2020-01-05T16:10:12+5:302020-01-05T16:10:23+5:30
खातेवाटपात मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुद्धा झाला असल्याचे आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.
मुंबई: गेल्या आठवडाभरापासून तीन पक्षांच्या वाटाघाटीत रखडलेले राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली. तर खातेवाटपावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
खातेवाटपात सुद्धा राजकरण करण्यात आले आहे. आपल्या सोईचं राजकारण जिथं जमलं त्या माणसाला मंत्री करण्यात आले. तर महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्ष भुकेलेला असून, भूक जास्त लागली म्हणून या तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं, असा टोला निलेश राणेंनी सरकाराला लगावला.
याचवेळी त्यांनी पर्यटन मंत्री व शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत कधी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा लढवली नाही. त्यामुळे त्यांना देण्यात आलेले पर्यावरण खातं ते कसे संभाळणार ?असं म्हणत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
तर खातेवाटपात मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुद्धा झाला असल्याचे आरोपही निलेश राणे यांनी केला आहे. मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंना करोडो रुपये दिल्याने उदय सामंताना मंत्रिपद मिळाल्याचा आरोप निलेश राणेंनी केला. त्यामुळे दिलेले पैसे मिळालेल्या मंत्रिपदातून वसूल कसे करायचे, याचाच विचार सामंत करत असणार, अशी टीकाही निलेश राणेंनी केली.