मुंबई : मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची प्रशासकीय धावपळ सुरु असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. बैठका, उद्धाटन अशा कार्यक्रमातून वेळ काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसाच्या महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री महाबळेश्वर मुक्कामी असून राजभवन या शासकीय निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या ३ दिवसांच्या सुट्टीवरून भाजपचे नेते निलेश राणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "मी 1995 पासून ते 2019 पर्यंत 6 मुख्यमंत्री बघितले. पण त्या पदावर असताना त्यांनी कधीही सुट्टी घेतलेली आठवत नाही. मात्र राज्यातील सरकार स्थापनेला 3 महिने झाले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 3 दिवस सुट्टीवर. ठाकरे यांनी असा कोणता मोठा पराक्रम केला ह्या तीन महिन्यात, ज्यामुळे त्यांना सुट्टी घ्यावी लागत आहे. झेपत नसेल तर त्यांनी खुर्ची खाली करावी", असा खोचक टोला यावेळी निलेश राणेंनी लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाबळेश्वर दौऱ्यावर असल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली असून पोलीस प्रशासन, पालिका, महसूल, बांधकाम विभागासह सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. मुख्यमंत्री सहा आसनी हेलिकॉप्टरने येणार असल्याने या हेलिकॉप्टरचे पंख मोठे असतात. त्यामुळे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागा शोधण्याची कसरत प्रशासनाला करावी लागली. वनविभागाकडून गेल्या अनेक वर्षापासून पोलो मैदानावर हेलिकॉप्टर उतरण्यास बंदी केल्याने जागेची मोठी अडचण झाली. बुधवारी सायंकाळी वेण्णालेक येथील पठारासह महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर असलेल्या वेलोसिटीमधीलही जागेची पाहणी करण्यात आली. अखेर वेण्णालेक पठारावर हेलिकॉप्टर उतरण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.