- अतुल कुलकर्णी, मुंबई
विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. शिवाय विधान परिषदेचे उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्याच्या अटीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याचे समजते.राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आ. प्रकाश बिनसाळे अशा तीन जागा रिक्त होणार आहेत. त्यापैकी निंबाळकर आणि मुंडे यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले. परिषदेवर निवडून येण्यासाठी २७ मतांची गरज असून, काँग्रेसचे ४२ व राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. अशा स्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे फक्त तीन उमेदवार निवडून येऊ शकतात हे स्पष्ट होते. निंबाळकर सभापती व मुंडे विरोधी पक्षनेते असल्याने या दोन जागा राष्ट्रवादीला हव्या होत्या. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीसाठी काँग्रेसने माघार घ्यायची आणि त्या बदल्यात विधान परिषदेचे उपसभापतीपद घ्यायचे अशी तडजोड झाल्याचे सांगण्यात आले. उपसभापती वसंत डावखरे यांची निवडणूक अटीतटीची होणार आहे. तेथे भाजपा शिवसेना एकत्र राहिल्यास डावखरेंना निवडणूक कठीण आहे मात्र फोडाफोडी झालीच तर डावखरे विजयी होतील. ते विजयी झाले तरीही उपसभापतीपद काँग्रेसलाच मिळावे, असा आग्रह काँग्रेसने धरला. त्याला राष्ट्रवादीने मान्यता दिल्याचे समजते. शिवाय २०१८ साली होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला एक जागा जास्त देण्यासही राष्ट्रवादीने संमती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे प्रकाश बिनसाळे, काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन, दीप्ती चवधरी आणि अपक्ष म्हणून निवडून आलेले विजय सावंत यांची संधी हुकणार आहे. शिवसेनेने त्यांच्या कोट्यातून परिवहनमंत्री दिवाकर रावते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उमेदवारी दिली आहे. १० जागांमध्ये भाजपाच्या शोभाताई फडणवीस आणि विनायक मेटे या दोन जागा होत्या. मात्र आता भाजपाचे १२३ आमदार आहेत. त्या जोरावर भाजपा पाच जणांना परिषदेत पाठवण्याची तयारी करत आहे. त्यात सुजीतसिंग ठाकूर यांचे नाव निश्चित झाल्याचे भाजपा नेते सांगत आहेत.