ठाणे : भिवंडीसारखे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालवणाºया काही आरोपींचे जाळे मुंब्य्रातही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे. तसेच भिवंडी येथील कारवाईतील नऊ आरोपींना न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.सिम बॉक्सच्या मदतीने आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल्स राउट करून संबंधित व्यक्तीला जोडणारे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचे जाळे खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी शोधून काढले होते. या तंत्रज्ञानाचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने बुधवारी भिवंडी येथे मोठी कारवाई करण्यात आली. यातील सर्व ९ आरोपींना न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींपैकी एक जण विज्ञान शाखेचा पदवीधर असून उर्वरित आठ अल्पशिक्षित आहेत. अल्पशिक्षित आरोपी तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा बेमालूमपणे कसे करायचे, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. मुंब्य्रातही काही अनधिकृत एक्स्चेंज बºयाच दिवसांपासून सुरू असल्याची माहिती पोलिसांना आरोपींकडून मिळाली. त्यानुसार, कारवाईसाठी आवश्यक तपशील काढला जात असून मुंब्रा येथे लवकरच कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालवणाºया टोळीचा एक हस्तक पोलिसांच्या हाती लागला आहे. या हस्तकाकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळत आहे. देशभरातील मोठमोठ्या शहरांमध्ये हा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती या हस्तकाकडून पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात या कारवाईची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.तक्रारदारांना आवाहन-अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजच्या मदतीने आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल संबंधित व्यक्तीच्या मोबाइलवर अनधिकृतरीत्या वळवले जातात. असे आलेले कॉल आंतरराष्ट्रीय नव्हे, तर स्थानिक असल्याचे दिसते. मोबाइल फोन ग्राहकांना अनेकदा आंतरराष्ट्रीय कॉल आला तरी स्थानिक नंबरवरून येतात. मात्र, त्याकडे कुणी गांभीर्याने लक्ष देत नाही. अशा मोबाइल फोन ग्राहकांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचे मुंब्य्रातही धागेदोरे: नऊ आरोपी पोलीस कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 4:27 AM