- समाज सेवा शाखेची कारवाई
मुंबई: मालाडच्या कुरार परिसरातून नऊ बाल मजुरांची सुटका करण्यात समाजसेवा शाखेला यश आले आहे. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांची समाजसेवा शाखा आणि चाईल्ड लाईन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.मालाडच्या आप्पापाडा परिसरात असलेल्या दिवकृपा सोसायटीमध्ये काही बालमजुरांना राबविले जात असल्याची माहिती चाईल्ड लाईनला मिळाली. त्यानुसार त्यांनी याबाबत समाजसेवा शाखेला कळविले. समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी याठिकाणी सापळा रचत एका इमिटेशन दागिन्यांच्या कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत जवळपास नऊ बालमजुरांना सोडविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी कारखाना चालक, त्याचा पार्टनर आणि दोन पर्यवेक्षकांना ताब्यात घेत त्यांना कुरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचेही त्यांनी नमुद केले. संदिप निर्मल जाना (२८) , जयप्रकाश तिलकधारी यादव (३५), विभास गुणेधर सामंत (२५) आणि व मानस नंदन पाया (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु असून सुटका करण्यात आलेल्या नऊ मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले असल्याचे कुरार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिंबन्ना व्हनमाने यांनी सांगितले.