नारायण जाधव -ठाणेराज्यातील सागरी जिल्ह्यांत नाबार्डकडून मिळणाऱ्या ग्रामीण पायाभूत विकास निधीतून नऊ ठिकाणी १२० कोटी रुपये खर्चून जेट्टी बांधून पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत़ यात पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या झाई आणि पालघरच्या केळवा-दादर येथील जेट्टींचा समावेश आहे़ या दोन्ही जेट्टींवर प्रत्येकी १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ त्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर परिसरातील मच्छीमारांना मासळी उतरवणे, सुकवणे, लिलाव करणे सोपे होणार आहे़इतर सात जेट्टींमध्ये मुंबईच्या अंधेरी येथील खारदांडा (सहा कोटी ९० लाख) आणि जुहूतारा (आठ कोटी), नवापाडा- उरण (१५ कोटी), थेरोंडा- अलिबाग (४२ कोटी), एकदरा- अलिबाग (१० कोटी), तांबडडेग- सिंधुदुर्ग (नऊ कोटी), केळूस- सिंधुदुर्ग (नऊ कोटी १० लाख) या जेट्टींचा समावेश आहे़या सर्व ठिकाणी लिलावगृह, रॅम्प तागुरणीचे शेड, प्रसाधनगृह, विंधण विहीर, पाण्याची टाकी, पाइपलाइन, सौरदिवे या सुविधा पुरविण्यात येणार आहेत़ या सर्व जेट्टी रुंद राहणार असून परिसरातील गाळ काढण्याच्या कामाचाही यात समावेश असल्याने या नऊ बंदरावर मासळीची ने-आण करणे सोपे होणार आहे़ यामुळे मच्छीमारांच्या दैनंदिन अडचणी दूर होणार असून त्यांचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई, ठाणे-पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या सागरी जिल्ह्यांतील मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे़
राज्यात १२० कोटींच्या नऊ जेट्टी
By admin | Published: January 07, 2015 10:24 PM