मुंबई : राज्यातील बहुसंख्य भागात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. मात्र त्यात मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील परभणी आणि जालना जिल्ह्यात चार, विदर्भात वाशिम जिल्ह्यात मायलेकीसह तीन, नाशिकमध्ये १५ वर्षांचा एक मुलगा व नगर जिल्ह्यात एका महिलेचा वीज पडून बळी गेला. नांदेड वगळता मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातही दोन दिवस पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये मिळून तब्बल १६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोलापूर, कोल्हापूर, रायगडलाही पावसाने झोडपले. हस्ताच्या पावसाने रब्बी पिकाच्या आशा पल्लवित केल्यात. ठाणे जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटात अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबईकरांना दिलासाअरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे कोकणसह मुंबईत शुक्रवारी दमदार सरींनी हजेरी लावली. सकाळी पडलेले ऊन आणि दुपारी दाटून आलेले ढग, अशा दुहेरी वातावरणानंतर सायंकाळी दाखल झालेल्या जलधारांनी तापलेल्या मुंबईला थंडगार केले.
वीज पडून नऊ ठार
By admin | Published: October 03, 2015 3:54 AM