नागपूर/जळगाव : राज्यात वीज कोसळून गेल्या चोवीस तासांत ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये विदर्भातील सात शेतकऱ्यांसह जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे़ अचानक आलेल्या वादळामुळे गोंधळल्याने एका झोपडीचा आधार घेणाऱ्या सहा शेतकऱ्यांचा झोपडीवरच वीज पडून दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना गुरूवारी सायंकाळी ६ च्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील वडगाव शेतशिवारात घडली. तर नागपुरातील नरखेड येथेही वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत जळगाव जिल्ह्यात बुधवारी रात्री दोघांचा मृत्यू झाला़ गडचांदूर येथील दुर्घटनेतील मृतांमध्ये केशव चव्हाण (४५), चंदू आस्वले (३२), पकंज हस्ते (२२), राजू गेडाम (३५), भाऊराव पेंदोर (४०), बापूराव पेंदोर (५०) यांचा समावेश आहे़ घटनेनंतर दोन तासांपर्यंत कोणताही प्रशासकीय अधिकारी वा पोलीस घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांनीच जखमींना बैलबंडीने गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिपळा (केवळराम) शिवारात शेतात काम करणाऱ्या विश्वेश्वर वैद्य (५०) यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. जळगाव जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. मुक्ताईनगर तालुक्यात विक्रम नारायण डहाके (४५) हे आणि भुसावळ तालुक्यातील संजय अरुण पवार (२७) अशी मृतांची नावे आहेत. दुसरीकडे साकेगाव (ता. भुसावळ) येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरच वीज कोसळली. (लोकत न्यूज नेटवर्क)
वीज कोसळून नऊ ठार
By admin | Published: June 12, 2015 3:54 AM