मुंबई/पुणे : राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असून, शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर व दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरी बरसल्या. मुंबईत दुपारी चारनंतर अंधार दाटला आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला. वीज पडून पालघर, धुळ्यात प्रत्येकी तीन, सोलापूरमध्ये दोन तर मुंबईत एकाचा असे एकूण नऊ बळी गेले आहेत.
६ ते ११ आॅक्टोबर कालावधीत विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने दिला होता. मुंबईत भरदुपारी रात्रीसारखे वातावरण झाले होते. वरळी येथील प्रवीण तुकाराम जाधव (३५) यांच्या शेजारी वीज पडल्याने धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धुळे जिल्ह्यात गव्हाणे येथे सुरेखाबाई दगडू पाटील (५०) व त्यांची मुलगी मोनिका (१८) आणि वाठोडा येथे उखुबाई दारासिंग पावरा (२०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हिवरे येथे पांडुरंग चांगदेव लबडे (६५) व पापरी योगेश सुनील भोसले (२०) यांचा वीज पडून मृत्यू झाला.राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ७ ते ९ आणि विदर्भात ७ व ८ आॅक्टोबरला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.पालघर, डहाणू, विक्र मगड, वसई तालुक्यात संध्याकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मनोर जवळील म्हसकर पाड्यातील संगीता सखाराम सुतार (४१), आंबेदा येथील वसंत कृष्णा पाटील (५४) तर विक्र मगडमध्ये एकनाथ काशीनाथ शेलार (३५ रा. केव) या तिघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. -वृत्त/२