भिवंडी : शहरातील कणेरी भागात जुन्या इमारतीस लागलेल्या आगीत नऊ खोल्या जळून भस्मसात झाल्या. ही घटना रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. शहरातील कणेरी भागातील जरीमरी देवळामागे मूलचंदशेठची ४० वर्षांपूर्वी बांधलेली तळ अधिक दोन मजल्यांची जुनी इमारत असून, त्यात पागडीने भाडोत्री राहत आहेत. त्यापैकी दुसऱ्या मजल्यावर पत्र्यांचे छप्पर असलेल्या तीन खोल्यांत पुठ्ठे व भंगार सामान ठेवले होते. त्या भंगारास लागलेल्या आगीत सामानासह तीन खोल्या जळाल्या; तसेच आगीची धग लाकडी पार्टिशनच्या सहा खोल्यांना लागून त्यादेखील भक्षस्थानी पडल्या. आग लागल्याचे कळताच सर्व कुटुंबे इमारतीच्या बाहेर पळाली. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी एका तासात आग आटोक्यात आणली. परंतु, लाकडी पार्टिशनच्या खोलीत राहणाऱ्या कुटुंबांचे संसार आगीत जळून खाक झाल्याने ती सर्व रस्त्यावर आली आहेत. या जळिताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भिवंडीतील जुन्या इमारतीतील नऊ खोल्या जळल्या
By admin | Published: February 29, 2016 4:30 AM