पंकज रोडेकर,
ठाणे- विनातिकीट प्रवास करणे, हा सामाजिक गुन्हा असतानाही लोकलने विनातिकीट बेधडक प्रवास केला जातो. अशा प्रकारे ठाणे रेल्वे स्थानकात मागील १५ महिन्यांत जवळपास ९ हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडले आहे. ही कारवाई रेल्वे प्रशासनाने केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून जवळपास २४ लाख ७५ हजारांचा दंड आकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऐतिहासिक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे ७-८ लाख प्रवासी येजा करीत असल्याने नेहमीच गजबलेला असतो. या रेल्वे स्थानकात एकूण १० फलाट असून येथून मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल धावतात. त्यातच या स्थानकातून आतबाहेर करण्यासाठी जवळपास अधिकृत १९ मार्गिका आहेत. त्यामधील फलाट क्रमांक २ आणि १० यावरून थेट बाहेर पडणे शक्य होते. ठाणे शहराचे दिवसेंदिवस झपाट्याने नागरीकरण होत असल्याने कळतनकळत त्या स्थानकावर ताण पडताना दिसतो. सर्वाधिक व्यस्त स्थानक अशी ओळख असलेल्या या स्थानकातून ठाणे ते बोरीबंदर पहिली लोकल धावली. त्यामुळे या स्थानकाला विशेष महत्त्व आहे. येथे पहिल्या सरकत्या जिन्यापासून वातानुकूलित शौचालयासह अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था केली आहे. त्यातच, मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या शहरांत येण्याजाण्यासाठी या स्थानकाची मदत होत असल्याने लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्यादेखील वाढली.>विशेष म्हणजे सर्वाधिक अशा प्रकारे प्रवास करणारे प्रवासी हे फलाट क्र मांक २, ९ व १० वर अधिक प्रमाणात आढळून आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.