दयानंद पाईकराव,
नागपूर- विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती असे म्हटले जाते. मात्र शासकीय कार्यालयात बऱ्याच वेळा विजेचा अपव्यय केला जातो. विजेची बचत करण्याबरोबरच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ‘डीआरएम’ इमारतीवर १० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा केंद्राची स्थापना करून नऊ हजार युनिटची निर्मिती केली आहे.‘डीआरएम’ कार्यालयाचा आदर्श घेऊन राज्यभरातील शासकीय कार्यालयांनी हा उपक्रम राबविल्यास राज्यातील विजेचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मागील वर्षी तत्कालीन ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांच्या कार्यकाळात सौरऊर्जा केंद्र सुरू करण्यात आले. तेव्हापासून दर महिन्यास येथे १ हजार ते १४०० युनिट विजेची निर्मिती सातत्याने करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात ९८२ युनिट वीजनिर्मिती झाली होती. >डीआरएम कार्यालयानंतर लवकरच रेल्वे रुग्णालय आणि नागपूर रेल्वे स्थानकावर सौरऊर्जा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यालयाला लागणारी वीज येथेच तयार होईल. - प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग