मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, असा निर्णय होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बुधवारी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.गायकवाड यांनी मंगळवारी विभागाच्या व राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हिडिओद्वारे संवाद साधला आणि परीक्षांचे नियोजन कसे करता येईल, याची चाचपणी केली. इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात परीक्षेविना प्रवेश द्यावा, याबाबत आजच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही कल होता, असे सूत्रांनी सांगितले.इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यांना विनापरीक्षा पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्यात येणार आहे. तसाच निर्णय इयत्ता नववी आणि अकरावीबाबतही घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, असे गायकवाड यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचे प्रवेश खूप उशिराने सुरू झाले. मागील काही आठवड्यांपर्यंत हे प्रवेश सुरू होते, यामुळे अभ्याक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही, तसेच नववीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात राज्यातील विविध विभागांकडून माहिती घेऊन त्यातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती करताना, त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा विषय लक्षात घेतला जाईल, त्यासाठीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.दहावी परीक्षा ऑफलाइनचराज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. त्यामध्ये तूर्तास कोणताही बदल केला जाणार नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले, तर ऐनवेळी काही बदल करण्याचा विषय आला तर त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही या बैठकीत ठरले असल्याचे सांगण्यात आले.
नववी, अकरावीचे विद्यार्थी पुढच्या वर्गात?; मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर परीक्षांबाबत आज होणार अंतिम निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 3:08 AM