मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने अखेर पहिली ते आठवीप्रमाणेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गोन्नती म्हणजे परीक्षेविना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला.वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या, मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू हाेते. नववी व अकरावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे त्यांच्या पुढील दहावी व बारावीच्या वर्गांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र काेरोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अंतर्गत मूल्यमापन कसे करणार? मार्गदर्शक सूचना असतील यासंबंधी परिपत्रक एससीईआरटी येत्या २ ते ३ दिवसांत काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल.काेरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचे प्रवेश उशिराने सुरू झाले. मागील काही आठवड्यांपर्यंत हे प्रवेश सुरू होते. यामुळे अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. तसेच नववीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात राज्यातील विविध विभागांकडून माहिती घेऊन वर्गोन्नती देताना त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा विषय लक्षात घेतला जाईल. त्यासाठी मार्गदर्शक सूचना एससीईआरटीकडून जारी करण्यात येईल. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.ऑफलाइन परीक्षा ही ग्रामीण विद्यार्थ्यांची मागणीराज्यातील अनेक शाळांमध्ये व खेड्यापाड्यात संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्र्यांकडे केली. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांची संधी प्रत्येकाला मिळावी या हेतूने परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
नववी, अकरावीतील विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्षात- वर्षा गायकवाड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 2:44 AM