लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा भाजप आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याचा केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. डावखरे यांनी कंपनीत संचालक असलेल्या किरण गोसावी यांना हजर केले. हे ते गोसावी नाहीत. मात्र केवळ नामसाधर्म्याचा लाभ घेऊन समाजमाध्यमांमध्ये स्नॅप शॉट्स व्हायरल करून बदनामी केल्याबद्दल सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला.
मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे स्नॅप शॉट्स शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. त्या स्नॅप शॉटसमध्ये डावखरे यांच्या पत्नीचे नाव गोसावी यांच्यासोबत दिसत होते. त्यामुळे डावखरे यांनी किरण प्रकाश गोसावी याला शनिवारी पत्रकारांसमोर हजर केले. तसेच त्याच्याकडील पुरावे सादर केले. आर्यन खानच्या माध्यमातून स्वत:चा पर्सनल अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करणारे मलिक तोंडघशी पडल्याची टीका डावखरे यांनी केली.
या प्रकारात ‘खोदा पहाड निकला चुहा’, अशी मलिकांची स्थिती झाली असल्याचे ते म्हणाले. मित्र परिवाराने आणलेला गांजा पिऊन व खोटी माहिती देऊन कोणीही दिशाभूल करू नये, असा टोला त्यांनी लगावला. ट्र्यू पॅथलॅबचे संचालक असलेल्या किरण प्रकाश गोसावी यांच्या आणि आर्यन प्रकरणातील गोसावी यांच्यात नामसाधर्म्य आढळल्यानंतर बदनामी करण्याचा डाव शिजला, असे ते म्हणाले. दीड महिन्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गौप्यस्फोट करण्याचे मलिक यांनी जाहीर केले आहे. परंतु हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी, पूर परिस्थिती, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची चर्चा टाळण्याबरोबरच विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हाच त्या वक्तव्याचा अर्थ आहे.
दरम्यान, गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी पुणे पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना मी माझी कागदपत्रे व पासपोर्ट दाखवला. केवळ नावात साम्य असल्यामुळे मला नाहक त्रास झाला, असे ट्र्यू पॅथलॅबचे संचालक किरण गोसावी यांनी सांगितले.