जमीर काझी, मुंबईतरुणी व महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे. अशा सजग व जागरूक नागरिकांना शासनातर्फे एक लाखांच्या रकमेसह विशेष ‘निर्भय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.गुन्हा घडतानाचा त्याला प्रतिबंध होऊन आपत्ती टळावी, महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी, यासाठी दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे निकष पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या समितीकडून निश्चित करण्यात येत आहेत. दरवर्षी पोलीस आयुक्त व अधीक्षक या पुरस्कारासाठी धाडसी नागरिकांच्या नावांच्या शिफारशीचा प्रस्ताव महासंचालकांकडे सादर करतील, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. अशा घटनांची नोंद पोलीस दप्तरी घेतली जाणार आहे. वर्षभरातील अशा घटनांचे मूल्यमापन संबंधित पोलीस आयुक्तालय, अधीक्षकांकडून केले जाईल. त्यातून सर्वोत्कृष्ट व्यक्तीचे नाव ‘निर्भय’ पुरस्कारासाठी पोलीस महासंचालकांकडे पाठविले जाईल. निवड झालेल्या व्यक्तीला रोख एक लाख आणि पारितोषिक देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, अशा जागरुक व्यक्तीचा गौरव झाल्यास इतरांनाही प्रोत्साहन मिळेल, यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महिला अत्याचार रोखण्यासाठी ‘निर्भय’
By admin | Published: July 13, 2015 1:39 AM