अकोला : अनिवासी भारतीय (एनआयआर) व भारतीय पशुवैद्यक (व्हीसीआय) परिषदेच्या कोट्यातील रिक्त जागेवर महाराष्ट्र पशुविज्ञान (माफसू) विद्यापीठाकडून पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आता स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी माफसूने विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत ठराव पारित करू न घेतला आहे.
दरम्यान, पदवी अभ्यासक्रमासाठी माफसूतर्फे ऑनलाईन प्रवेश स्वीकारणे सुरू झाले असून, एकही जागा रिक्त राहू नये याकरिता, स्पॉट ॲडमिशनदेखील केले जाणार आहे.राज्यात मुबंई, नागपूर, उदगीर, परभणी, शिरवड, अकोला व वरू ड या सात ठिकाणी माफसूंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. दुग्धशास्त्र, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयाचा समावेश आहे. दुसर्या धवलक्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. याकरिता पशुवैद्यक शास्त्रज्ञ निर्माण करण्यासाठी माफसू व इतर संबंधित शासकीय यंत्रणेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्या दृष्टीने पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. शिरवड व उदगीर येथे ३२ विद्यार्थी संख्या होती. आता ही संख्या दुप्पट म्हणजे ६४ करण्यात येत आहे. या संबंधीचे परिपत्रक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधी निघणार असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही महाविद्यालयाच्या जागा मिळून राज्यात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची एकूण २६६ एवढी संख्या आहे. यामध्ये एनआयआर १० व व्हीसीआय ४० अशा एकूण ५० जागा आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी प्रवेशासाठी येतच नसल्यामुळे त्या जागा रिक्त राहतात. त्यामुळे या जागा आता माफसू भरणार आहे. अर्थात राज्यातील गरजू विद्यार्थ्यांना त्या जागेवर प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय या वर्षीपासून स्पॉट ॲडमिशन केले जाणार आहे. - प्रवेश शुल्क नातेवाइकांनी भरावे एनआयआर व व्हीसीआयकडून येणार्या विद्यार्थ्यांच्या यादीवर माफसूने काही अटी घातल्या आहेत. यातील ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांच्या स्थानिक नातेवाइकांना प्रवेश शुल्क अदा करावे लागणार आहे. तेव्हाच माफसू त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देईल.** पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यावर्षी प्रथमच एनआरआय व व्हीसीआयच्या कोट्यातील रिक्त जागा माफसू भरणार आहे. ज्यांना प्रवेश हवा आहे, त्यांच्या स्थानिक नातेवाइकांना प्रवेश शुल्क अदा करावे लागेल. - डॉ. आदित्यकुमार मिश्र, कुलगुरू माफसू, नागपूर.