मुंबई : घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मोफत प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीने करावे, अशी मागणी करणारे पत्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अरुण जेटली यांना पाठवले आहे. संत नामदेवांच्या कर्मभूमीत पंजाबमधील घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ एप्रिलदरम्यान होत आहे. या संमेलनात मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक, कवी, कलाकार मंडळी यांची उपस्थिती आहे. राज्यातील अनेक रसिकांना संमेलनातील चर्चासत्रे, भाषणे पाहण्याची उत्सुकता असते. पण, राज्यातील रसिकांना या संमेलनाला मुकावे लागणार आहे. कारण, सह्याद्री वाहिनीने साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण करण्यासाठी साहित्य मंडळाकडे अव्वाच्या सव्वा रक्कम मागितली. मंडळाला इतकी रक्कम देणे शक्य नाही. यामुळेच रसिकांना या संमेलनाचे प्रक्षेपण थेट पाहता येणार नाही. तरीही सह्याद्रीने साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण मोफत करावे, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. राज्यात सह्याद्री वाहिनी सर्वांत जास्त पाहिली जाते. राज्यातील ११ कोटी जनता संमेलन पाहता येणार नसल्यामुळे दुखावली आहे. दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण सह्याद्रीवर मोफत प्रक्षेपित करण्यात आले होते. पण आता मराठी भाषा आणि साहित्याच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन का ठेवला जात आहे, असा सवालदेखील निरुपम यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
साहित्य संमेलनाचे मोफत प्रक्षेपण व्हावे - निरुपम
By admin | Published: April 04, 2015 4:46 AM